दरवर्षी एक महिन्याचा यात्रा महोत्सव design

         श्री भगवतीमातेचा यात्रामहोत्सव दरवर्षी पौष शुध्द पौर्णिमा ते माघ शुध्द पौर्णिमा असा महिनाभर साजरा केला जातो. महिनाभर यात्रोत्सव चालणारे हे संपूर्ण भारत वर्षातील एकमेव जागृत देवस्थान आहे. या काळात अनेक धार्मिक विधींबरोबरच श्री भगवतीदेवी यात्रोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यात्रा महोत्सवास पहाटे महाआरतीने प्रारंभ होतो. सायंकाळी श्री भगवतीमातेच्या छबीना पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये ढोलताशे, सनई, चौघडा, नाचगाणे यांचे आकर्षण ठरते. मिरवणुकीत बहुसंख्येने ग्रामस्थ सहभागी होतात. छबीना मिरवणूक देवी मंदिरात पोहोचल्यानंतर रात्री शोभेच्या दारु कामाची जोरदार आतषबाजी केली जाते. दुसऱ्या दिवशी नामांकित पहिलवानांच्या कुस्त्यांचा जंगी फड भरविला जातो. तसेच लोककलावंतांच्या हजेऱ्या होऊन त्यांना बिदागी वाटप केली जाते. यात्रेनिमित्ताने मंदिर तसेच परिसरात नेत्रदिपक विद्युत रोषणाई केली जाते. मंदिराच्या भव्य प्रांगणात पुजा साहित्य, मिठाई, तांब्यापीतळेची भांडी, खेळणी तसेच स्त्रीयांच्या अलंकार-आभुषणांची दुकाने थाटली जातात. ओटी भरणे, देवीला चोळीपातळ नेसवणे, लिंब नेसणे, लोटांगणे घालणे. नवस फेडणे व इतर विधी येथे मोठ्या उत्साहात पार पाडले जातात. देवीची दररोज पूजा व आरती करुन नैवेद्य दाखविण्यात येतो.

नवरात्र महोत्सव
design

         श्री भगवतीदेवीचा नवरात्र महोत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा ते दशमी म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत मोठया उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला जातो. श्री भगवती मंदिर व परिसरात तसेच गावात मुख्य ठिकाणी नेत्रदिपक विद्युत रोषणाई केली जाते. नवरात्रात दररोज पहाटे सव्वा पाच वाजता काकड आरती व सायंकाळी सव्वा सात वाजता महाआरती होते. नवरात्र काळात दररोज दुर्गा सप्तशती पाठ पठण, जोगवा, देवीची दृष्ट काढणे, स्त्रीयांचा फेर आदि धार्मिक कार्यक्रम मंदिराच्या भव्य सभामंडपात साजरे होतात. नवरात्रकाळात नवस फेडण्यासाठी भाविक सवाद्य मिरवणुकीने देवीस फुलवरा वाहतात. स्थानिक तसेच बाहेर गावाहून येणारे, नऊ दिवस उपवास करणारे (घटी बसणारे) स्त्री-पुरुष भाविक मंदिरातच वास्तव्यास असतात. त्यांची सर्व व्यवस्था मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थ करतात. पाचव्या व सातव्या माळेला कोल्हार-भगवतीपूर गावच्या पाटील परिवाराच्या वतीने देवीस चोळी-पातळ व तळी भरण्याचा मान असतो. यावेळी उपस्थित भाविक व गावकऱ्यांना पानसुपारी दिली जाते. अष्टमीस नवचंडी होम-हवन (यज्ञविधी) होतो. नवमीस घटविसर्जन होऊन दशमीस महापूजा होते. नवरात्रात देवीस अलंकृत केले जाते. यात सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.