श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्यावतीने मंदिराचे काम व सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून याअंतर्गत भाविकांसाठी विविध सुविधा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. श्री भगवतीमाता मंदिराचे जुने मंदिर पाडून त्याठिकाणी आजतागयत सुमारे १ कोटी ३० लाख रुपये खर्च करुन सुंदर व मनमोहक असे भव्यदिव्य मंदिर बांधण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. मुख्य मंदिरामध्ये अग्रणीभागात ४०x४० फुटाचे दोन सभामंडप असून मागील भागात ६०x३० फूटाचा सभामंडप आहे. मंदिरात कार्यालय, विद्युत विभाग, दिपमाळ बांधण्यात आली असून २२x२० फूटाचे व्यासपीठ आहे. ८ खोल्या आणि ३५ फूट दिपमाळ तसेच १५ फूट उंच व १८ फूट रुंदीचे भव्य लोखंडी प्रवेशद्वार बनविण्यात आले आहे. सभामंडपात २८ खांब (पीलर) असून ६५ फूट उंच व त्यावर ६ १/५ फूट धातूचा कळस बांधण्यात आला आहे. नगर-मनमाड राजमार्गावर दर्शनी भागात बांधण्यात आलेली श्री भगवती देवी मंदिर नावाची कमान खास आकर्षण बनले आहे. सुमारे ४० फुट रुंद आणि ३१ फुट उंच रेखीव व कलात्मपणे बांधण्यात आलेल्या या कमानीला रंगरंगोटीमुळे अधिकच शोभा आली आहे. ही कमान बांधण्यास जवळजवळ दीड लाख रुपये खर्च आला असून अशाच प्रकारच्या आणखी ३ कमानी गावातील मुख्य ठिकाणी बांधण्यात येणार आहे. श्री भगवतीदेवी मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यामध्ये आगामी काळात ४०x२० फूटाच्या कमानी बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घटी बसणाऱ्या महिलांसाठी एक भव्य दोन मजली इमारत बांधण्यात आली असून मंदिराच्या डाव्या बाजूला ही इमारत उभी आहे. ३० हजार २२७ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या मंदिरात दर्शनरांग ९० फूट लांब व १० फूट रुंद असे दोन भाग आहेत. मंदिराच्या अग्रणी भागात भव्य अष्टकोनी दिपमाळ बांधण्यात आली असून अष्टकोनी यज्ञमंडपही निर्माण करण्यात आला आहे. मंदिरामध्ये तसेच मंदिराच्या बाहेरील भागात सुंदर ग्रेनाईट फरशी बसविण्यात आलेली आहे. श्री भगवती मंदिरात सभा मंडपात व मंदिराच्या गाभाऱ्यात ग्रेनाईट, मार्बल बसविले आहे. सभामंडपातील नक्षीकाम येथे येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेते.
श्री भगवतीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यानंतर विश्वस्त मंडळ आगामी काळामध्ये शिक्षण संस्था, शेतीशाळा, दवाखाना, अनाथाश्रम, वसतीगृह, वेदपाठशाळा, आध्यात्मिक संस्कार केंद्र, मोफत वाचनालय, वृद्धाश्रम, गोशाळा आदि लोककल्याणकारी प्रकल्प राबविण्याचा संकल्प मनात आहे. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन नगर-मनमाड हमरस्त्याने शनी शिंगणापूर शनी महाराजांचे दर्शन घेण्यास जाणारे भाविक न चुकता कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवतीमातेचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.