महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे
design

आपल्या देशात ६२ शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत. (काहींच्या मते ही संख्या १०८ आहे.) महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे परिचयाची आहेत. त्यात कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, तुळजापूरची भवानी माता ही पूर्ण पीठे तर वणीचे सप्तश्रुंगी अर्धे पीठ आहे. या साडेतीन शक्तीपीठांची माहिती

१) तुळजापूर

image

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. तुळजाभवानीचे प्राचीन मंदिर हेमाडपंथी शिल्पाचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. या तुळजापूरचे जुने नांव चिंचपूर असे होते. यादव कालानंतर शिवकालामध्ये तुळजाभवानीचे महात्म्य अधिक वाढले. त्वरजा किंवा तुरजा या नावापासून तुळजा हे नांव बनले. देवीची सुमारे तीन फूट उंचीची प्रभावळीसह पण सुटीअशी काळ्या पाषाणाची मूर्ती उंच सिंहासनावर उभी आहे. मस्तकीच्या मुकुटावर सायोनिलिंग असून मुकुटाखालून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. ही अष्टभुजा असून पाठीवर बाणांचा भाता आहे. हिच्या मुखाच्या उजव्या-डाव्या अंगांना चंद्र-सूर्य आहे. उजवा पाय महिषासुरावर असून त्याच्या उजवीकडे सिंह व त्याखाली मार्कंडेय ऋषी आहेत. देवीची दररोज चार वेळा पूजा होते. वर्षातून तीन वेळा देवीची निद्रा असते. देवीच्या सर्व उत्सवात नवरात्रीचा उत्सव मोठा असतो. या नऊ दिवसांत नित्य महापूजा होते. प्रत्येक रात्री वाहन बदलून देवीचा छबिना काढतात. श्री छत्रपतींची आराध्य देवता असलेली तुळजाभवानी स्फुर्तीदेवता वाटू लागते. या देवीस महाराष्ट्राची कुलस्वामिनी असेही म्हणतात.

२) माहुर ची रेणुकादेवी

image

नांदेड जिल्ह्यातील माहूर पूर्वीचे नांव मातापूर असे होते. त्याचाच अपभ्रंश माहूर असा झाला. ही माता म्हणजे जमदग्नीची भार्या रेणुका व रेणु राजाची यज्ञातून उत्पन्न झालेली कन्या होय. देवीच्या साडेतीन पीठांतील मूळ पीठ, दत्तात्रयांचे शयनस्थान आणि ऋषीमुनींचे तप:स्थान असे अनेकांगी माहात्म्य असल्यामुळे माहूर क्षेत्रात यात्रेकरूंची वर्दळ असते. या रेणुकेला एकवीरा असेही म्हणतात. मंदिर गिरीशिखरावर आहे. मंदिराचे वास्तुशिल्प प्राचीन पद्धतीचे आहे. गाभाऱ्यात रेणुकेची मूर्ती नसून तिचा तांदळा आहे. त्यालाच शिरोभागाचा आकार देऊन त्यावर चांदीचा टोप चढविलेला आहे. तिच्या बैठकीवर सिंह कोरलेला आहे. देवीचे ध्यान भव्य व उग्र दिसते. जवळच दत्तात्रयांचे स्थान आहे. माहूर हे महानुभव संप्रदायाचेही एक प्रमुख स्थान आहे. परशुरामाने माहूर क्षेत्री जमदग्नीचा अग्निसंस्कार केला आणि रेणुका तिथे सती गेली. म्हणून माहूर हे रेणुकेचे प्रमुख स्थान मानले जाते. तिचा प्रसाद म्हणून विड्याची पाने कुटून देण्याची पद्धत आहे.


३) कोल्हापूर

image

कोल्हापूरची अंबाबाई महाराष्ट्र व कर्नाटकची कुलस्वामीनी आहे. स्कंद पुराणातल्या करवीर माहात्म्यात या नगराला दक्षिण काशी असे म्हटले आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात हे अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. पण पुढे आठव्या शतकात ते पुन्हा बांधले गेले. मंदिर त्रिशुलाकृती असून पश्चिमाभिमुख आहे. हेमाडपंथी वास्तुकला प्रतीत करणारे हे मंदिर एकाच वेळी न बांधता वेगवेगळ्या राजांच्या कारकीर्दीत बांधले जात होते. मंदिरात चार शिलालेख असून ते देवनागरीत आहे. मूळ अंबामातेची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. तिला चार हस्त आहेत. हातात ढाल, गदा, पानपात्र, म्हाळुंग आहे. ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन देवतांचे एकत्रीकरण अंबाबाईत झाले आहे असे भाविक मानतात. अंबाबाईने हा परिसर आपल्या गदेने महापुरापासून वाचविला म्हणून या परिसरास करवीर असे नांव पडले. तर दुसऱ्या एका कथेनुसार या परिसरातील एका टेकडीवर 'कोल्हासूर' नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून या भागास 'कोल्हापूर' हे नांव पडले असे म्हटले जाते. दरवर्षी तीन खास दिवस असतात. चैत्री पौर्णिमा, अश्विनी शुध्द पंचमी व अश्विन शुध्द पौर्णिमा हे ते तीन दिवस होय. तसेच नवरात्र अष्टमीस हवन असते. मंगळवार व शुक्रवारी देवीस श्रीसूक्ताचा अभिषेक असतो. मंदिराच्या विशिष्ट पद्धतीच्या बांधकामामुळे माघ महिन्यात सूर्यकिरण सुर्यास्थाच्यावेळी थेट देवीच्या मुखकमलावर पडतात. नवरात्र काळात देवीची नित्य महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

४) अर्धे पीठ सप्तश्रृंगी

image

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी येथे सप्तश्रृंगीदेवीचे स्थान आहे. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. मार्कंडेय ऋषींनी या ठिकाणी घोर तपश्चर्या केली आणि देवी प्रसन्न झाली. व तिने सांगितल्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना केली. यामुळेच पिठाच्या समोरील डोंगराला मार्कंडेयाचा डोंगर असे म्हणतात. सातशृंगे किंवा शिखरे असलेल्या डोंगरावरील देवीचे स्थान म्हणून या क्षेत्रास सप्तश्रृंगी असे म्हणतात. पण प्रत्यक्ष पाहता तिथे चारच डोंगरशिखरे आढळून आल्यामुळे चर्तुश्रृंगी असेही संबोधतात. सप्तश्रृंगनामक एका डोंगरावर हे स्थान आहे. हा डोंगर समुद्रसपाटीपासून अंदाजे साडेचार हजार फूट उंच आहे. देवीचे स्थान स्वयंभू आहे. देवीची मूर्ती भव्य, अंदाजे ८ ते १० फूट उंच, उभी व अष्टदशभुजायुक्त अशी आहे. देवीला सदैव सिंदुराचे विलेपन केलेले असते. ही मूर्ती एका प्रचंड खडकात कोरलेली आहे. ती पूर्वाभिमुख असून तिच्या डाव्या बाजूचा हात कानावर टेकलेला आहे. किंचित त्याच बाजूला कललेल्या अवस्थेत ती उभी आहे. चैत्री व अश्विनी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते.