एक जागृत देवस्थान श्री भगवतीमाता
मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला प्राचीन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे. दु:खितांचे दु:ख दूर करणारी, भक्ताला शक्ती व युक्ती प्रदान करुन जीवनात येणाऱ्या संकटांना निर्भिडपणे सामोरे जाण्यासाठी धैर्य देणारी, जीवनात भगवतीमातेचे स्थान काही वेगळेच मानले जाते. कोल्हार भगवतीपूरच नव्हे तर महाराष्ट्रामधील असंख्य भाविकांनी देवी भगवतीला मातेच्या रुपात मानले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूरचे ग्रामदैवत म्हणजेच श्री भगवतीमाता सर्वत्र प्रसिध्द आहे. हे एक जागृत देवस्थान आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामध्ये श्री साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर, नगर-मनमाड रस्त्यावरील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या या भगवतीमाता मंदिरात तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता, माहुरची श्री रेणुका माता, वणीची श्री सप्तश्रृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची श्री भगवती माता असे साडेतीन शक्तीपीठांचे एकत्रीत आणि दुर्लभ वस्तीस्थान आहे. श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे भक्तगण मोठया संख्येने येतात. या साडेतीन शक्तीपीठाचे एकत्रीत वस्तीस्थान लाभलेल्या पूण्यभूमीत तीर्थक्षेत्राचे स्वरुप लाभले आहे. नवसाला पावणाऱ्या, भक्तांची मनोकामना पूर्णत्वास नेणाऱ्या श्री भगवतीमातेचा महिमा जितका वर्णावा तितका थोडाच.